शंभरचिरा–पाटोदा रस्ता कामात मोठा भ्रष्टाचार?
अँड. नरसिंग जाधव यांचा आरोप; उच्चस्तरीय चौकशी व कारवाईची मागणी
न्याय न मिळाल्यास हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा
पाटोदा : न्यूज
जवळाला फाटा ते पाटोदा (शंभरचिरा) दरम्यानच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत (PMGSY) सुरू असलेल्या ५.३ किलोमीटर रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जा व आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांमुळे संतप्त नागरिकांनी आज (५ डिसेंबर २०२५) तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
या कामासाठी शासनाकडून ₹६६१.११ लाख (सुमारे ₹६.६१ कोटी) निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष कामामध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
=======================
अँड. जाधव यांचा ठेकेदार–प्रशासनावर थेट आरोप
उपोषणादरम्यान अँड. नरसिंग जाधव यांनी रस्त्याच्या गुणवत्तेच्या नावाखाली भ्रष्टाचार झाल्याचे दस्तऐवजांसहित मांडले.
“नियम धाब्यावर बसवून निकृष्ट सामग्रीचा वापर केला जात आहे. शासन, ग्रामविकास विभाग, ग्रामीण रस्ते विकास संस्था यांना अनेक वेळा तक्रारी दिल्या तरी ठेकेदार पुन्हा तेच काम सुरू करतो. सार्वजनिक निधीची उघड लूट चालली आहे; हे अजिबात सहन केले जाणार नाही,” असे जाधव म्हणाले.
======================
तहसीलदारांना सादर केलेल्या प्रमुख मागण्या
उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला खालील मागण्या सादर केल्या—
रस्त्याच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय समितीकडून तातडीने चौकशी करावी.
नागरिकांच्या पैशाची लूट करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे.
या कामावर देखरेख करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी.
अंदाजपत्रक व तांत्रिक मानकांनुसारच गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करणे बंधनकारक करावे.
==========≠=========
हायकोर्टात जाण्याचा इशारा
नागरिकांनी चेतावणी दिली की, “जर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गैरव्यवहार थांबवला नाही, तर आम्हाला उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करावी लागेल.”
रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचारावरून परिसरात तीव्र नाराजी असून पुढील काही दिवसांत या आंदोलनाला वेग येण्याची शक्यता आहे.
.jpeg)

Post a Comment
0 Comments